भुसावळ –शहरातील साक्री फाट्याजवळ हायवे लगत असलेल्या हॉटेल तनारीका समोर वॅगनआर कार मधून सुमारे चार लाख ३६ हजार ७२० रुपये किंमतीच्या विमल गुटखासह एका संशयित आरोपीस कारसह ताब्यात घेतल्याची घटना ९ जानेवारी रोजी ११.१५ वाजेच्या सुमारास येथे घडली .
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील साक्री फाट्याजवळ हायवे लगत असलेल्या हॉटेल तनारीका समोर,
केसरयुक्त विमल पान मसाला महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्यात प्रतिबंधित असलेले मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधीत पान मसाला संशयित आरोपी राहुल कुमार मनोहरलाल साधवानी ( वय ३२ राहणार रास्तीपुरा,सिंधी कॉलनी मागे बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) हा भुसावळच्या दिशेने मारुती सुझुकी कंपनीच्या पांढऱ्या रंगाची व्हॅगनआर ( कार )
क्रमांक एम.एच.१९ सी.एफ. १६२० मध्ये घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ.गोपाल पोपट गव्हाळे व पोकॉ सचिन रमेश पोळ यांनी घटनास्थळी सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित वाहनाला थांबवून पाहणी केली तर कारमध्ये तंबाखूजन्य केसर युक्त सुगंधीत पान मसाला व चारचाकी वाहन मिळून आल्याने पोलिसांनी संशयित आरोपीकडून एकूण ४,३६,७२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोकॉ सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास गोपाल गव्हाळे करीत आहे



