भुसावळातील नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीं मैत्रोत्सवातून लुटला मनमुराद आनंद : १९७९ एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहसंमेलन मेळावा :

भुसावळ – येथील के.नारखेडे विद्यालयातील इ.स. १९७९ एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा नुकताच दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी तापी नदी तीरावरील रेणुका माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. के.नारखेडे विद्यालयातून इ.स. १९७९ मध्ये एसएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा हा ८ वा स्नेहसंमेलन मेळावा होता. सदरील मेळाव्यास एकूण ७८ जणांनी उपस्थिती नोंदवली. या बॅचचे विशेष म्हणजे २०१३ पासून कोरोना कालावधी वगळता हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सतत सुरू आहे. यापूर्वी हे स्नेहसंमेलन ३ वेळेस भुसावळ, २ वेळेस मुंबई,१ वेळेस पुणे व १ वेळेस नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. सदरील स्नेहसंमेलन मेळाव्यास भुसावळ,मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, खामगाव,इंदोर व बऱ्हाणपूर येथून मित्र-मैत्रिणींनी सहकुटुंब हजेरी लावली.
सुरुवातीला सर्वांनी रजिस्टर मध्ये आपले नाव,पत्ता व फोन नंबर याची नोंद करुन मंदिर परिसरातील देवतांचे दर्शन घेऊन नंतर अल्पोपहार घेतला.
सकाळी ठीक १० वाजता दीपप्रज्वलन,सरस्वती पूजन झाल्यावर सौ. ज्योती बोरकर यांनी सरस्वती वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व मित्र-मैत्रिणींनी शालेय प्रार्थना म्हणून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. गेल्या काही वर्षात जे मित्र- मैत्रिणी यांना देवाज्ञा झाली त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नव्याने प्रथमतः स्नेहसंमेलनास उपस्थित झालेल्या मित्रांचा परिचय करून देण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या मित्रांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवेत असतांनाच्या आठवणी व सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य यावर सुनील पाटील व अनिल जोशी व इतर काही मित्रांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच सौ. वैशाली चौधरी व प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. चंद्रकांत बागुल यांनी स्वरचित बहारदार गोंधळ सादर केला त्यात देवी देवतांना आवाहन करीत गुरु व सर्व मित्रांना यापुढे देखील स्नेहसंमेलनात मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. सौ.स्नेहा चासकर यांनी तुझ्या गळा माझ्या गळा’ या गीताचे औषधीवर आधारित विडंबनात्मक गाणे तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या हे सादर करून सर्वांना हसवले. त्यानंतर रेखा ब-हाटे आणि ज्योती बोरकर यांनी संस्कृत मध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा 15वा अध्याय सादर केला

दुपारी १ते ३ या वेळेत सर्वांनी खानदेशातील प्रसिद्ध मेनू भरीत-पुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला व गप्पा टप्पा केल्या.
जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर काही मित्र-मैत्रिणींनी तापी काठच्या निसर्गरम्य वातावरणात फेरफटका मारून सेल्फी घेतल्या. जमलेल्या सर्वांनी रेणुका माता मंदिर,परिसर, प्रशस्त असा सभागृह व स्वच्छता यांची खूप प्रशंसा केली. दुपारच्या सत्रात ग्रुप फोटोचा कार्यक्रम व विविध खेळ घेण्यात आले. प्रसंगी सर्व मित्रांसोबत आलेल्या कुटुंबियांनी कार्यक्रमाचा मनसोक्त व मनमुराद आनंद लुटला.
सरते शेवटी वियोगाची वेळ जवळ आल्यावर कुणालाही एकमेकाला सोडून जावं असं वाटत नव्हतं, मात्र साश्रुनयनांनीं जड अंतकरणाने पुन्हा भेटू असे आश्वासन घेत मित्र-मैत्रिणी व त्यांच्यासोबत आलेले कुटुंबीय यांनी निरोप घेतला .
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. वैशाली चौधरी यांनी केले. सुनील पाटील यांनी रेणुका माता मंदिराचे सर्व विश्वस्त, पुजारी,कर्मचारी तसेच येवले केटरर्स यांचे आभार मानले व भुसावळ टीमचे मनापासून कौतुक केले. यशस्वीतेसाठी प्रदीप राणे सर, अनिल जोशी व अनिल जावळे यांचेसह भुसावळ येथे राहणाऱ्या टीमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.