भुसावळ – भुसावळ येथील कला विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील उपप्राचार्य आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस व्ही पाटील यांची महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.डॉ.पाटील हे मुळचे सावदा येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावदा येथेच झाले असून पुढील उच्च शिक्षण जळगाव व धुळे येथे झालेले आहे. त्यांना एकूण ३५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांचे आजतागायत विविध जर्नल्स मध्ये एकूण १२ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत, तसेच त्यांचे वनस्पतीशास्त्र विषयाच्या पदवी वर्गांसाठी एकूण ०४ पाठ्यपुस्तके प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये एकूण १० शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे. डॉ.पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत वनस्पतीशास्त्र विषयाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून महाविद्यालयातील मान्यताप्राप्त वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत प्रभारी क्रीडा संचालक, एन.एस.एस. अधिकारी, उपप्राचार्य, रुसा समन्वयक, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक, जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या समन्वयक तसेच महाविद्यालयातील सर्व वैधानिक व अवैधानिक समित्यांचे प्रमुख म्हणूनही काम केलेले आहे.
सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्र, गायन, वादन, अध्यात्म तसेच पर्यटनाची विशेष आवड असलेले असे बहुआयामी व्यक्तिमत्व महाविद्यालयास प्रभारी प्राचार्य म्हणून लाभले आहेत.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.डॉ. मोहनभाऊ फालक, चेअरमन मा.श्री.महेशभाऊ फालक, सचिव मा.श्री.विष्णू भाऊ चौधरी कोषाध्यक्ष मा.श्री.संजयकुमारजी नाहाटा आणि व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



