फैजपूर : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या वढोदे ता. यावल येथे २९ ते ३१ डिसेंबर २०२२ आयोजित समरसता महाकुंभ साठी चार जगद्गुरु यांच्यासह ४०० च्या वर संतमहंत, अखिल भारतीय संत समितीचे प्रमुख, अनेक आखाड्यांचे प्रमुख, महामंडलेश्वर, पद्मश्री, द्वाराचार्य, सद्गुरु, स्वामी अशा विविध उपाधी असलेल्या विभूती उपस्थित राहणार असून या संत संमेलनात बंधुभाव, समानता, धर्मरक्षण, वात्सल्य, प्रेमभाव या विषयांवर उपस्थित महानुभावांच्या अमृतवाणीतून मंथन होणार आहे. भाविकांसाठी हे संमेलन मोठी अद्भुत पर्वणी ठरणार आहे.
येथील सतपंथ संस्थानचे गादीपती अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्यासह प. पू. महामंडलेश्वर श्री मनमोहनदासजी (श्री राधे राधे बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली हे समरसता महाकुंभ संमेलन होणार असून त्यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. वढोदे गाव त्यासाठी सज्ज होताना दिसत असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असून त्यासाठी मिळेल ते काम, सेवा गावातील लहान थोर महिला पुरुषांसह भाविक भक्त करीत आहे हा एक अनोखा सोहळा असून आमच्या वढोदा गावासाठी श्री रामाची अयोध्या नगरी झाली असून आमच्या गावाचे रूप पालटले असल्याची प्रतिक्रिया गावकरी देत आहे. संमेलन स्थळी साठ हजार स्क्वेअर फुट जागेत भव्य सभा मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यात ५० ते ६० हजार भाविक एकाच वेळी या संमेलनाचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भव्य व्यासपीठ, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, ठीक ठिकाणी पार्किंग वाहन तळ व्यवस्था आयोजकां तर्फे करण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या समरसता महाकुंभाचा लाभ घेता येईल अशी सुटसुटीत व्यवस्था करण्यात येणार असून हा सर्व कार्यक्रम सीसीटिव्ही च्या निगराणीत राहणार आहे. या समरसता महा कुंभाच्या निमित्ताने निष्कलंकधाम व परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. या महाकुंभाच्या निमित्ताने बारा वर्षांपूर्वी झालेल्या वैदिक धर्म संमेलनाला सुध्दा उजाळा मिळणार आहे.
त्या धर्म संमेलनाची आठवण करून देणारा असा दैदिप्यमान सोहळा असणार आहे. त्यासाठी विविध समित्या युद्ध पातळीवर कामाला लागले आहे.
चौकट
या जगद्गुरूंची राहणार उपस्थिती
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती प्रयागराज, निर्मल आखाड्याचे प्रमुख निर्मलपिठाधिश्वर श्री महंत ज्ञानदेवसिंह महाराज हरिद्वार, जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज प्रेरणापीठ पिराणा गुजरात, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष सप्तम कुबेराचार्य अविचलदास महाराज सारसापुरी, स्वामी परमानंद महाराज हरिद्वार, जगद्गुरु रामानंदचार्य रामराजेश्वराचार्य विदर्भ पिठाधिश्वर अमरावती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज हरिद्वार, जगद्गुरु जगद्गुरु शंकराचार्य स्वामी ज्ञानानंदतीर्थ जी भानुपुरा पिठ मध्य प्रदेश, बडा उदासीन आखाडा हरिद्वार चे प.पू. श्रीमहंत रघु मुनिजी महाराज, प.पू. श्रद्धेय श्री पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोर मध्य प्रदेश, मनीराम छावणी अयोध्या येथील प पू श्री. वि. महंत कमल नयन दास जी महाराज, दुर्गा नरसिंह मंदिर दिल्ली येथील आचार्य महामंडलेश्वर बालकानंद गिरीजी महाराज, राजकोट येथील हिंदू धर्म आचार्य सभा महामंत्री महंत स्वामी श्री परमात्मा आनंद सरस्वती जी महाराज, श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी हरि चेतनानंदजी महाराज हरिद्वार, ओ श्री वी चतुसंप्रदाय श्री महंत फुलडोल बिहारी दासजी महाराज चैतन्य कुटी वृंदावन, अखिल भारतीय संत समिती निर्देशक पप्पू महामंडलेश्वर आचार्य श्री धर्म देव जी महाराज, प.पू.दीदी मॉ साध्वी ऋतुंबरा जी वृंदावन, ह भ प चैतन्य जी महाराज देगलूरकर, श्रध्देेय सद्गुरु धर्मप्रसाद दासजी वडताल, श्रद्धेय श्री प्रसाद जी महाराज अमळनेर, परमपूज्य गोपाल चैतन्यजी महाराज वृंदावन धाम पाल, परम पूज्य आचार्य मानेकर बाबा शास्त्री यांच्यासह जवळपास ४०० च्या वर संत महंत उपस्थिती देणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.



