भुसावळ – शहरातील भोई नगर परिसरातील वीज ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्यात आली. प्रतापराव रूपंचंद भोई यांच्या नावे असलेल्या बिलामध्ये खूप मोठी तफावत होती. ७८ युनिट वीज खर्च झाले असताना ३४६७ युनिटचा वापर दाखविण्यात आला. ५०,३८० रुपयाचे वाढीव देयक ग्राहकाला मिळाले. दिनकर चौधरी यांना एकाच महिन्यात १९१४ युनिट देण्यात आले, ज्यामुळे देयकाची रक्कम २७,९७० रुपये झाली. याबाबत त्यांनी तक्रार केली असता प्रथम दखल घेण्यात आली नाही. सहा ते सातवेळा हेलपाटे मारल्यानंतर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे नागरिकांनी समस्या मांडली.
६६, ८१८ रुपयांची दुरुस्ती:
प्रा.पाटील यांनी वीज मीटर तपासून देण्याचा आग्रह धरला. मीटरमध्ये दोष आहे असे मीटर तपासल्यानंतर समोर येते. प्रताप भोई यांच्या देयकात ४७, ४३८ रुपये आणि दिनकर चौधरी यांच्या देयकात १९, ६८० रुपयांची अशी एकूण ६६, ८१८ रुपयांची दुरुस्ती करण्यात शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील यांना यश आले. परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांचे आभार मानले.
वीज देयक दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना हेेलपाटे मारावे लागतात. यामुळे त्यांच्या रोजच्या कामावर-रोजगारावर परिणाम होतोय. गोर गरीब वस्तीतील सामान्य नागरिकांना अवास्तव रक्कमेची देयके देणे हे चुकीचे आहे. देयक दुरुस्ती दोन दिवसात होणे अपेक्षित असते. वीज बिल समस्या असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन प्रा.पाटील यांनी केले आहे.



