.
भुसावळ – राज्यात अथवा देशात कोणतेही संकट आले, तर सर्वप्रथम शिवसैनिकच धावून येतो. शिवसैनिकांनी वारंवार हे दाखवून दिल्याचे प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर यांनी भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील शिवसंपर्क अभियानात केले.
या वेळी आगामी निवडणुकांसदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षातील मतभेद दूर करण्याचे आवाहन केले. राज्यात महाविकास आघाडी सरकारने कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी मुकाबला केला. यामुळेच देशात पाच टॉपमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान देऊन विविध संस्थांनी गौरवले आहे. ज्या वेळी देशावर एखादे संकट येते तेव्हा शिवसैनिक सर्वप्रथम धाव घेतात, हे वारंवार दिसून आले आहे. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकेलही, असा विश्वास घनगुटकर यांनी व्यक्त केला. पक्षातील मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकजुटीने कामाला लागणे आवश्यक आहे. यासाठी शिवसेनेने केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली पाहिजे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या वेळी व्यासपिठावर जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, स्थानीय लोकधिकार समिती सदस्य किशोर घाडी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘‘जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकण्यासाठी सर्वांनी निर्धार करावा. दोन्ही ठिकाणी भगवा फडकावल्यानंतरच खऱ्या अर्थाने शिवसंपर्क अभियान सार्थकी लागेल.’ असे मत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केले.




