भुसावळ – शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलं आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख गिरीष विचारे यांनी दिली. भुसावळ विधानसभेसाठी संपर्क अभियान निरीक्षक म्हणून शिवसेना भवनातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ शासकीय विश्रामगृहात विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना बैठकीत संपर्कप्रमुख विचारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा संदेश देऊन पक्षाचे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
इतकी वर्षे राजकारणात सोबत केल्यानंतर अंगावर आलेल्या भाजपला शिंगावर घेण्याची तयारी शिवसेना करत आहे. आगामी जिप, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत अद्दल घडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विधानसभा मतदारसंघ शिवसंपर्क अभियानाचे नियोजन सुरू केले आहे. त्याच्यासाठी जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याप्रसंगी भुसावळ शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले.
शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात, आणि वॉर्डात शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतलेले जनहिताचे निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले.
भुसावळ, वरणगाव शहरासह गटनिहाय २५ मे तळवेल, २६ मे साकेगाव व २७ मे वराडसीम येथे बैठकीचे आयोजन केले आहे. शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन भुसावळ शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.



