भुसावळात श्री पांडुरंगराय व संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचे स्वागत ;


भुसावळ : श्री संत मुक्ताईच्या 725 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथील श्री6 पांडुरंगराय पादुका व त्र्यंबकेश्वर येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचा पालखी सोहळ्याचे मंगळवारी शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळ आमदार संजय सावकारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान भुसावळचे अध्यक्ष सुहास फालक यांनी पादुका पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
हरीनामाच्या गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत
श्री संत मुक्ताईच्या 725 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून निघालेल्या श्री पांडूरंगराय पादूका व त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचे मंगळवारी शहरात आगमन झाले. पांडूरंगाच्या पादूकांसोबत हभप कुलदीप कुलकर्णी, हभप अनिल गुरव, हभप सूर्यकांत भिसे तर निवृत्तीनाथांच्या पादूकांसोबत हभप जयंत महाराज गोसावी, हभप विनीत सबनीस आदींची उपस्थिती होती. शहरातील व्हीएम वॉर्डातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानतर्फे अध्यक्ष सुहास फालक व ट्रस्टींनी स्वागत केले. यावेळी मुक्ताईनगरच्या श्री. मुक्ताई मंदिर संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, हभप रवींद्र महाराज हरणे, हभप विजय महाराज खवले, हभप शिवशंकर लांडे, आचार्य हभप शिवाजी रायपुरे आदी उपस्थित होते. शहरातील अष्टभुजा देवी मंदिरापासून जामनेररोड मार्गाने पादुका पालखी व्हीएम वॉर्डातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली. टाळ, मृदुंग व हरीनामाच्या गजरात निघालेल्या या भव्य पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनाची रीघ कायम होती.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे प्रशांत बर्‍हाटे, संजीव पाटील, वासुदेव बोंडे, सुधीर पाटील, बाळू यावलकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, राजू महाजन, प्रल्हाद फालक, निळकंठ फालक आदींसह विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.