भुसावळ : रेल्वेच्या चारचाकी वाहन पार्किंगमध्ये अवघ्या १५ मिनिटांसाठी ३० रुपयांची आकारणी करण्यात आली. याबाबत डीआरयूसीसीचे सदस्य तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत ठेकेदाराला ५ हजार रुपये दंड करण्यात आला.

शहरातील रेल्वे स्थानकावर उत्तर व दक्षिण बाजूने दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग आहे. मात्र, येथे लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी डीआरयूसीसीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी स्थानकावर गेले होते. अवघ्या १५ मिनिटांत ते परतले. या कालावधीसाठी रेल्वे पार्किंगवरील कामगाराने त्यांच्याकडून ३० रुपयांची मागणी केली. पैस भरल्यावर त्यांना पावती दिली. मात्र १५ रुपयांऐवजी दुप्पट ३० रुपयांची आकारणी होत असल्याने कुलकर्णी यांनी डीआरएम कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधीत ठेकेदारावर पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. यापूर्वी देखील संबंधीत ठेकेदाराला तीन वेळा दंड झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांना दिली. पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यास ठेका रद्द केला जाणार आहे.
दरपत्रक लावावे, सीसीटीव्ही कॅमेर बसवावे पार्किंग ठेकेदारांवर रेल्वे प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे. पार्किंग शुल्काचे दरपत्रक तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी या ठिकाणी असली पाहिजे. तेव्हाच हे प्रकार थांबतील. अनिरुद्ध कुलकर्णी, डीआरयूसीसी सदस्य, भुसावळ


