भुसावळ : भुसावळ एसटी आगारात वाहक आणि चालक कामावर येण्याचे प्रमाण आता वाढले आहे. सोमवारी ४५ वाहक व चालक कामावर रुजू झाले. यामुळे एसटीची सेवा पूर्वपदावर येण्यास मदत झाली. आगाराने दोन दिवसांत ८ मुक्कामी फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन केले. यासोबतच मंगळवारपासून सुरतसाठी सकाळी १०.३० व दुपारी ४.३० वाजता दोन फेऱ्या वाढणार आहेत.

भुसावळ एसटी आगारात ८० चालक व १०१ वाहक आहेत. यापैकी ५८ चालक व ७३ वाहक कामावर रुजू झाले आहेत. यामुळे संपाच्या झळा आता कमी होत आहेत. भुसावळ आगाराने आता दोन दिवसांत पिंपळगाव, सावतर निंभोरा, खिरोदा, लोहारा-कळमसरा आदींसह ८ मुक्कामी फेऱ्या दोन दिवसांत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. पूर्वीच्या नियोजित वेळेवर ही सेवा सुरळीत होईल. मात्र, ज्या मुक्कामी फेऱ्यांमधून उत्पन्न मिळत नाही, अशा फेऱ्या बंद केल्या जातील. डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाढलेला खर्च आणि उत्पन्नात होणाऱ्या घटीमुळे हा निर्णय झाला. दरम्यान, मंगळवारपासून दि.१९ पासून सुरतसाठी दोन फेऱ्या वाढवल्या जाणार आहे. सकाळी १०.३० व दुपारी ४.३० वाजता सुरतसाठी भुसावळ डेपोतून बस रवाना होतील. यासोबतच पहाटे ४.३० वाजता औरंगाबाद, ५ वाजता रावेर-अजनाड, सकाळी साडेपाच व सात वाजता धुळे, सकाळी साडेपाच वाजता मलकापूर, ५.४५ वाजता पाचोरा या बसेस सोमवारी सोडण्यात आल्या. शुक्रवारपर्यंत सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होईल.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी शालेय सेवाही सुरू
शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसाठीच्या फेऱ्याही सुरु झाल्या आहेत. तसेच सुरवाडा, बेलव्हाय, बोदवड, वराडसीम, मुक्ताईनगर या मार्गावरील फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत. ग्रामपंचायती किंवा शाळांकडून शालेय फेऱ्यांची मागणी झाल्यास उर्वरित फेऱ्या सुरु होतील. शुक्रवारपासून (दि. २२) ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु होणार आहेत.


