भुसावळ – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२ ची प्रारूप प्रभाग रचनेत मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले आणि नद्या यांच्या सीमा निश्चित करून प्रभाग रचना करणे अपेक्षित होते, परंतु नवीन प्रभाग क्रमांक ८ ची प्रारूप रचना त्याप्रमाणे झालेली नाही. नवीन प्रभाग क्रमांक ७ आणि ९ ची सीमा तयार करतांना मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले आणि नद्या विचारात घेतलेल्या आहेत. भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये प्रभाग क्रमांक ८ (जुना) मध्ये असलेले भोई नगर, श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी परिसर नैसर्गिक नाले यांच्या सीमा निश्चित करून जुना प्रभाग ७ आणि आताचा नवीन प्रभाग ८ मध्ये सामील करण्यात आला. परंतु जुना सातारा येथील मरीमाता मंदिर परिसर आणि मरीमाता मंदिर मागील परिसर मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले यांच्या अनुषंघाने नवीन प्रभाग क्रमांक ७ मध्ये सामील करणे आवश्यक होते परंतु हेतूपुरस्सर हा भाग नवीन प्रभाग क्रमांक ८ मध्ये चुकीच्या पध्दतीने सामील करण्यात आला आहे. या प्रारूप रचनेवर शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील आक्षेप घेऊन भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावर यांच्याकडे हरकत नोंदवली आहे. दूषित मनोवृत्तीने हा प्रकार केला गेला असावा असे यात नमूद केले आहे. हा भाग प्रभाग ८ मधून कमी करून प्रभाग क्रमांक ७ मध्ये सामील करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.



