सायक्लोथॉन स्पर्धेत १०८२ स्पर्धकांचा सहभाग : नगरपरिषद व रोटरी क्लबचा उपक्रम: अभूतपूर्व प्रतिसाद :


भुसावळ – नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल यांनी ‘माझी वसुंधरा अभिनयान २.०’ अंतर्गत आयोजित सायक्लोथॉन रॅली उत्साह आणि जोषपूर्ण वातावरणात पार पडली.
‘स्वच्छ भुसावळ, प्रदूषण रहित भुसावळ ’ हे घोष वाक्य असलेल्या या रॅलीत १०८२ सायकल स्वारांनी नोंदणी केली होती, ज्यात ४ वर्षांच्या चिमुरड्या पासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी रॅली पूर्ण करून सायकलिंगचा आनंद घेतला. भुसावळ सहित जळगाव, जामनेर व यावलचे सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले. त्याबरोबरच महिला सायकलस्वारांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. ५, १० आणि २० किमी अशा तीन विभागांमध्ये ही रॅली काढण्यात आली. सकाळी ५ वाजेपासून आबालवृद्धांनी डि. एस. ग्राउंडवर लगबग सुरू केली. तसेच सायक्लोथॉनला कार्यकम सुरु झाल्यानंतर आ. संजय सावकारे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी स्वतः सायकल चालवत ५ किमी रॅली पूर्ण केली.
रॅली नंतर भुसावळ नगरपरिषदेच्या प्रेरणेने सर्वांनी ’माझी वसुंधरा २.० ’ अभियाना अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेतली व रॅलीत सहभाग नोंदवला. याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नितीन लुंगे, गौरव अहिरे, सतिश देशमुख, वैभव पवार व नगरपरिषदचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर ‘माझी वसुंधरा’ अभियानांंतर्गत सायक्लोथॉनमध्ये लकी ड्रॉ द्वारे भाग्यवान विजेते निवडले गेले. यात पाच सायकल, पाच हेल्मेट व चार स्मार्ट वॉच देण्यात आल्या तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आ. संजय सावकारे, कर्नल चिनप्पा, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सायक्लोथॉनचे ब्रँड ऍम्बेसेडर विजय फिरके, सीमा पाडील, रोटरी क्लब आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.