भुसावळात पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेस उद्या पासून प्रारंभ : पोलिसांच्या बंदोबस्तात काढणार अतिक्रमण :

भुसावळ : शहरातील वर्दळीच्या सर्वच भागातील अतिक्रमण उद्या गुरुवार २४ पासून काढण्यात येत असून त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तही मागून घेतला आहे. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे.
यावल रोडपासून अतिक्रमण काढण्यास होणार प्रारंभ
२४ रोजी सकाळी १० वाजता यावल रोडवरील गांधी पुतळा ते डी.एस.ग्राऊंड तसेच नवजीवन फर्निचर मॉल ते नाहाटा व रजा टॉवर ते खडका रोड भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत भागातील अतिक्रमण पुढील दोन दिवसात काढण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
बुधवारी सायंकाळी पोलिस अधिकारी व पालिका अधिकार्‍यांमध्ये शहर पोलिस ठाण्यातील बैठकीत अतिक्रमण मोहिमेबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
अतिक्रमण काढताना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह दुय्यम कर्मचारी, आरसीपी प्लॉटून जवान सह पोलिसांचा तगडा बंदोबस्तास उपस्थित राहणार आहे .