टाटा मॅजिक व ट्रकमध्ये भीषण अपघात : नववधूसह पाच वर्‍हाडी ठार :


भोकर : लग्नाच्या दोन दिवसानंतरच नववधूसह पाच वर्‍हाडींचा भीषण अपघातात मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटीजवळ 21 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला तर नवरदेवासह सहा जण जखमी झाले.
जारीकोट, ता.धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा, ता.उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा, ता.उमरखेड येथे 19 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. त्यानंतर सोमवार, 21 रोजी मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे टाटा मॅचिजक (क्र.एम.एच.29-ए.आर.3229) जात असताना समोर भरधाव वेगाने येणारी ट्रक
(क्र.एम.एच.04-ए.एल.9955) ने जबर धडक दिल्याने झालेल्या नववधू पूजा ज्ञानेश्वर पामलवाड (20, रा.साखरा, ता.उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (30, रा.जामगाव, ता.उमरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (22, रा.साखरा), सुनील दिगंबर थोटे (30, रा.चालगणी, ता.उमरखेड) यांच्यासह अन्य एक (नाव समजु शकले नाही) अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला.
गंभीर जखमीमध्ये नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्यासह सुनीता अविनाश टोकलवार (40, रा.उमरी जहागीर, ता.हदगाव), गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष रा.उमरी जहागीर, ता.हदगाव), अविनाश संतोष टोकलवार (36 वर्षे, रा.उमरी जहागीर, ता.हदगाव), अभिनंदन मधुकर कसबे (12, रा.वाजेगाव) यांच्यासह 6 जणांचा समावेश आहे.