कल्याण : रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे काकीनाडा एक्सप्रेसमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपींना पकडण्यात यंत्रणेला यश आले आहे. काकीनाडा भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये मध्ये लूटपाट करणाऱ्या तबरेज शेख ,दानिश खान, अजय दबडे, निजान शेख आणि एका 14 वर्षीय मुलाला पकडण्यात आले आहे.
लूटमार करताना आरोपी जाळ्यात
27 फेब्रुवारी रोजी कल्याणमध्ये पाच जणांच्या टोळक्यांनी प्रवाशांची लूटमार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काही प्रवाशांनी 100 नंबर वर फोन करून नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानाने या पाच जणांना त्वरित ताब्यात घेतले. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पाच आरोपींमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले. चार आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

चाकूच्या धाकावर केली लूट
वसई येथे राहणाऱ्या जया पिसे या महिला त्यांच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. त्या सोलापूर येथून गाडीत बसल्या होत्या. 27 जानेवारी रोजी गाडी कर्जत स्टेशनजवळ आली असता काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरु केला. याच दरम्यान चार ते पाच जण महिलेच्या जवळ आले. वस्तूने भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता जया यांनी त्यांना प्रतिकार केला. एकाने चाकूचा धाक दाखवित महिलेकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एका सतर्क नागरिकाने 100 नंबरवरुन पोलिसांना फोन करून घडलेला सगळा प्रकार स्पष्ट केला. त्यानुसार, नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले. पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परीसरातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.


