नंदुरबार रेल्वे स्थानकावर बर्निंग ट्रेनचा थरार : आगीमुळे प्रवाशांनी गाडीबाहेर टाकल्या उड्या : अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल :


नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळच गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या पँट्रीकारच्या बोगीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजता घडताच प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला तर जीवाच्या थरकापाने अनेकांनी रेल्वे बोगीतून उड्याही मारल्या. या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. क्षतीग्रस्त बोगी वेगळी केल्यानंतर तासाभराच्या विलंबाने गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

गाडी स्थानकावर येत असतानाच लागली आग
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गांधीधाम-पुरी एक्सप्रेस नंदुरबार रेल्वे स्थानकावर येत असतानाच काहकी अंतरावरच रेल्वेच्या पँट्रीकार बोगीला मोठी आग लागली. याबाबतचे वृत्त रेल्वेच्या सर्व कोचमध्ये पसरताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. भीतीमुळे प्रवासी आरडाओरड करू लागले. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एकच खळबळ माजली. भडकलेली आग आणि धुराचे लोट यामुळे वातावरण तणाव आणि भीतीपूर्ण झाले. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रेल्वे चैन पुलिंग करून थांबवण्यात आल्यानंतर प्रवाशांनी तातडीने रेल्वे बाहेर उड्या टाकल्या. नियंत्रण कक्षाला कळविताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अधिकार्‍यांची धाव
रेल्वे पोलिस, अग्निशमन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांचे पथक घटनास्थळी झाले. ही आग जेवण बनविणार्‍या पॅँट्री कारला लागली होती. पँट्री कारला एक्सप्रेसपासून विलग करण्यात आले असून सर्व रेल्वे प्रवासी सुखरुप असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, तासाभराच्या विलंबनाने दुर्घटनाग्रस्त बोगीला बाजूला केल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.