जळगाव, प्रतिनिधी – घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के आढळून आल्याची घटना कासोदा येथे उघडकीस आली आहे. १९ लाख १७ हजार रुपये किमंतीचे हे सर्व दागिने व शिक्के स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आले असून कासोदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्हयातील कासोदा येथे ताराबाई गणपती समदानी यांचे जुने व पडक्या घराचे खोदकाम चालु असतांना त्या ठिकाणी सन १९०५ ते १९१९ काळातील चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने आढळून आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महाजन, चालक अशोक पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने कासोदा गावात जावून जप्त केले. शिक्के व दागिन्यांची ज्वेलरी दुकानदाराकडून तपासणी करुन खात्री करण्यात आली. हे चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने नाशिक येथील पुरातन विभागाकडे हस्तांतर करण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहेत.


