भुसावळ येथे मिलिटरी कँम्पमधील बँकेवर चोरीचा प्रयत्न :

भुसावळ – शहरातील झेडटीसी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना आज (ता. ७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही बँक मिलिट्री बटालियनच्या एरियात आहे. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त असतानाही बँकेची भिंत फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील झेडटीसी परिसरात मिलिटरी बटालियन कॅम्प आहे. त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा शाखा असून मिलिटरी जवानांसह परिसरातील नागरिकांना येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अज्ञात चोरट्याने बँकेतील स्ट्रॉंग रूममधील समोरील भिंतीला मागील बाजूला असलेल्या शौचालयमध्ये येऊन भिंतीला भगदाड पडले आहे. या मार्गाने बँकेत प्रवेश करून स्ट्राँगरूम मधील स्टॉपसेफला असलेले चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कर्मचारी बँकेत आले असता ही घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता येथील पथकाने जाऊन पाहणी केली.

तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी बँकेत जाऊन तेथील पाहणी केली. याबाबत भूषण येवलकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.