भुसावळ- येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयीच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून नामांकित नोंदणीकृत बौद्धिक संपदा व व्यापारी मुद्रा तज्ञ व बीएलआय कन्सलटंसीचे संचालक अॅडव्होकेट आशुतोष स्वर्णकार, अमरावती येथून दूरस्थ दूरसंचार माध्यमाद्वारे उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी अभ्यास, प्रयोग, संशोधन, परिणाम प्रकाशन आणि पेटेंटिंग अर्थात बौद्धिक संपदा अधिकारांची नोंदणी ह्या पायर्यांचा वापर करत व्यावसायिक पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. ए.व्हि. पाटील यांनी अंतिम वर्षाचे प्रकल्प हे निव्वळ रचनात्मक कार्य समजून त्यातून बौद्धिक संपदा कशी निर्माण होऊ शकेल हे पहिले पाहिजे असे सांगितले.
अॅडव्होकेट आशुतोष स्वर्णकार यांनी बौद्धिक संपदा हा अमूर्त मालमत्तेचा एक प्रकार असल्याचे सांगितले. बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व वेळीच लक्षात न आल्यामुळे बर्यााचदा एखादे उत्कृष्ट उत्पादन किंवा संकल्पना आर्थिक तसेच औद्योगिक प्रशंसा मिळवण्यापासून वंचित राहू शकते असे सांगितले. तसेच बौद्धिक संपदा अधिकार तसेच व्यापारी मुद्रा यांची नोंदणी, त्यामागची कायदेशीर प्रक्रिया, शुल्क आणि फायदे या विषयी अत्यंत सविस्तर मार्गदर्शन अॅडव्होकेट आशुतोष स्वर्णकार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभारप्रदर्शन प्रा.आय.डि.पॉल यांनी केले. सादर मार्गदर्शन वर्गात शंभरहून अधिक संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमानंतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.



