भुसावळ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केल्याची कारवाई शनिवारी केली होती. या प्रकरणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बऱ्हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली होती तर महिलेला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) याच्याही पथकाने शनिवारी रात्री उशिरा मुसक्या आवळल्याने अवैधरीत्या अंमल पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत असलेल्या हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या गांजा, ब्राऊन शुगर व हेरॉईनची वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता असून यातून जिल्ह्यात यापूर्वी ब्राऊन शुगरची झालेली वाहतूक तसेच खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
रावेर शहरातील डॉ. आंबेडकर चौकात एक महिला प्रतिबंधीत हेरॉईन (ब्राऊन शुगर) घेवून येणार असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजता सापळा रचण्यात आला होता. एका टॅक्सीतून संशयीत महिला अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा. मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता. जि. बऱ्हाणपूर) उतरताच रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या समक्ष महिला कर्मचाऱ्यांनी संशयीत महिलेकडील पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅगची झडती घेतली असता तिच्या ताब्यात 500.4 ग्रॅम वजनाचे हेरॉईनचे (ब्राऊन शुगर) दोन पाकिट आढळल्यानंतर महिलेला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
यावेळी महिलेकडून जप्त पदार्थाची तपासणी केल्यानंतर हा पदार्थ ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती.अटकेतील महिलेला अख्तरी बानो हिला पोलिस बंदोबस्तात रविवार, 19 रोजी सकाळीच भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोलारे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल तर सरकार पक्षातर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. यावेळी तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक उपस्थित होते.
अटकेतील महिला अख्तरी बानो हिने ब्राऊन शुगरचा पुरवठा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) याने केल्याची कबुली दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा आरोपीच्या मुसक्या आवळल्याने या प्रकरणातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


