भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु : शहरातील आंबेडकर मैदानाची स्वच्छता व सपाटीकरण : प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर


भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण व राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 रोजी भुसावळ शहराच्या दौर्‍यावर येत आहेत. या अनुषंगाने तयारीला वेग देण्यात आला असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान यांवर (डी.एस.ग्राऊंड) स्वच्छता तसेच व्यासपीठावर उभारणी स्थळाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी दिली.
अनेक दिग्गजांचा प्रवेश विकासकामांचे लोकार्पण
भुसावळ दौर्‍यावर येत असलेल्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणावर अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी एक वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण तसेच नगरपरीषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होईल तसेच दुपारी 1.30 वाजता आरपीडी रस्त्यावर डी.एस.ग्राऊंडवर (डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर पटांगण) राष्ट्रवादी जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
शहरातील डी.एस.ग्राऊंडवरील पटांगणावर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मैदानाच्या सपाटीकरणाला वेग दिला आहे. सोमवारी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पुरूषोेत्तम नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, सुमित बर्‍हाटे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी मैदान स्वच्छतेसह सपाटीकरणाच्या सूचना देण्यात आल्या.