भुसावळ : चाळीसगावसह धुळेकर प्रवाशांना लाभदायी ठरणारी चाळीसगाव-धुळे मेमू अखेर सोमवार, 13 रोजी सकाळी 9.20 वाजता धावली. नवी दिल्ली येथून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मेमूला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर तिचा शुभारंभ झाला. प्रसंगी खासदार उन्मेश पाटील व खासदार डॉ.सुभाष भामरे यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी ट्रायल रन असल्याने केवळ एकच फेरी या गाडीची होणार आहे तर दुसर्या दिवसापासून अर्थात मंगळवार, 14 डिसेंबरपासून या गाडीच्या दोन फेर्या होतील, असे सूत्रांनी सांगितले.

चाळीसगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चाळीसगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पालकमंत्री अब्दुल सत्तार, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगाव नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भुसावळ डीआरएम एस.एस.केडीया आदींची लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पहिल्या दिवशी होणार केवळ एक फेरी
सोमवार, 13 डिसेंबर रोजी मेमू गाडीची केवळ ट्रायल रन असल्याने एकच फेरी होणार आहे. गाडी क्रमांक 01111 चाळीसगावहून सोमवारी सकाळी 9.20 वाजता सुटल्यानंतर धुळे ती 10.25 वाजता पोहोचली तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01112 सकाळी 10.50 वाजता सुटल्यानंतर 11.35 वाजता चाळीसगावात पोहोचली.
सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा
कोरोनामुळे 24 मार्चपासून चाळीसगाव पॅसेंजर बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सोसत खाजगीसह अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत होता. त्यातच महिनाभरापासून एस.टी.देखील बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते मात्र आता मेमू सुरू होणार असल्याने प्रवाशांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. पॅसेंजरऐवजी मेमू धावणार असल्याने भाड्याच्या दरातदेखील मोठी वाढणार आहे. मेल एक्स्प्रेसप्रमाणे भाड्याची आकारणी केली जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेर्या होतील शिवाय रविवारी मात्र दिवसभर मेमू बंद ठेवण्यात येणार आहे तर प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन केल्यानंतरच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे शिवाय कोरोनाचे दोन डोस प्रवाशांना अनिवार्य आहेत.
मंगळवार, 14 डिसेंबरपासून मेमूच्या दोन फेर्या होणार
मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.


