चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनला व्हीडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून होणार शुभारंभ :

भुसावळ – रावसाहेब दादाराव पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, सोमवार दिनांक. १३.१२.२०२१ रोजी सकाळी ९.२० वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून चाळीसगाव – धुळे मेमू ट्रेन सेवेला व्हीडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. शुभारंभ विशेष गाडी चाळीसगावहून सकाळी ९.२० वाजता सुटणार असून धुळ्यात सकाळी १०.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात उद्घाटन विशेष गाडी धुळ्याहून सकाळी १०.५० वाजता सुटेल आणि चाळीसगाव येथे ११.५५ वाजता पोहोचेल. उद्घाटन विशेष गाडी क्रमांक 01111/01112 म्हणून चालेल आणि चाळीसगाव ते धुळे दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.

नियमित मेमू सेवा ट्रेन क्र. 01313/01314 चाळीसगाव – धुळे – चाळीसगाव या ट्रेन क्रमांकासह चालविण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाचे मंत्री, खासदार, धुळ्याचे महापौर, माननीय विधानसभा सदस्य आणि नगर परिषद, चाळीसगावचे अध्यक्ष याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. .

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनची ठळक वैशिष्ट्ये:

• मेमू ट्रेनमध्ये प्रवासात सुलभता वाढवण्यासाठी बेंच-प्रकारच्या कुशन सीट्स आहेत.

• प्रत्येक मेमू कोचला दुहेरी सरकणारे दरवाजे आणि एलइडी लाइटिंग प्रदान करण्यात आली आहे.

• प्रत्येक मेमू कोचमध्ये इको-फ्रेंडली बायो टॉयलेट प्रदान केले आहेत.

• प्रत्येक कोचमध्ये ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाईट फिटिंग प्रदान करण्यात आली आहे.

• आठ डब्यांच्या रेकमध्ये जास्त प्रवेग (एक्सलेरेशन) आणि डी-एक्सलेरेशन असते ज्यामुळे वेळेची बचत होते.

• यात ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रोपल्शन प्रणाली आहे.

मेमू सेवांच्या तपशीलवार वेळा:

01303 मेमू सेवा चाळीसगाव येथून दर सोमवार ते शनिवार ०६.३० वाजता सुटेल आणि धुळ्याला त्याच दिवशी ०७.३५ वाजता पोहोचेल.

01304 मेमू सेवा धुळ्याहून दर सोमवार ते शनिवार ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०८.५५ वाजता चाळीसगांवला पोहोचेल.

01313 मेमू सेवा चाळीसगांव येथून दर सोमवार ते शनिवार १७.३० वाजता सुटेल आणि धुळ्याला त्याच दिवशी १८.३५ वाजता पोहोचेल.

01314 मेमू सेवा धुळ्याहून दर सोमवार ते शनिवार १९.२० वाजता सुटेल आणि चाळीसगावला त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: भोरस बुद्रुक, जामधा, राजमाने, मोरदड तांडा, शिरूड, बोरविहीर, मोहाडी.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोविड-१९ साठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे. या सेवा अनारक्षित एक्स्प्रेस शुल्कासह चालविण्यात येतील.