भुसावळातील उपद्रवींचे जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भुसावळातील सरकारी वकिलांसोबत चर्चा :

भुसावळ : जंक्शनमधील गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर पोलिसांनी आता तिसरा डोळा उघडला आहे गुन्हेगारी थोपवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले असून. विविध गंभीर गुन्ह्यात न्यायालयात खटले सुरू असताना जामिनावर मुक्त असलेले आरोपी शहरात उपद्रव माजवत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा उपद्रवींची यादी तयार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. यानंतर संबंधितांचे जामीन रद्द करावे, यासाठी न्यायालयास विनंती करण्यात येणार असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सर्व सरकारी वकिलांची बैठक शहर पोलीस ठाण्यात शनिवारी घेतली.

उपद्रवींची पोलिसांनी यादी केली तयार
गंभीर गुन्हे असूनही जामिनावर बाहेर आल्यावर काही गुन्हेगारांचा उपद्रव थांबलेला नाही. ते शहरात अशांतता पसरवत आहेत. बाजारपेठ, शहर व तालुका या तिन्ही पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अशा उपद्रवींची यादी तयार करणे सुरू आहे. जामीन मिळाल्यापासून त्याने कधी व काय गुन्हे केले? याचा अहवाल तयार करण्यात येईल. यानंतर संबंधित गुन्हेगाराचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात येईल. जिल्ह्यात पहिल्यांदा असा प्रयोग भुसावळात राबवण्यात येत आहे. याबाबत डीवायएसपी वाघचौरे यांनी सरकारी वकिलांशी चर्चा केली. काही संशयीतांच्या मालमत्तांवर टाच आणण्याबाबतही चर्चा झाली मात्र असे संशयीत कोण? ही माहिती देणे पोलिसांनी तूर्त टाळले.

गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांचे आता कडक पाऊल
शहरात अलिकडच्या काळात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिसांनीदेखील गुन्हेगारी थोपवण्यासाठी विविधांगी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिस रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारांना हद्दपार करण्यासह संघटीत टोळ्यांची हद्दपारी करण्यात आली आहे शिवाय यापुढे कायद्याचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी संपूर्णपणे मोडीत काढण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.