जळगाव : सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून तालुक्यातील शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी पहाटे उघड झाला असतानाच शहरातील जुना आसोदा रोड येथील गोपाळपूरा येथील 27 वर्षीय तरुण पंकज उखर्डू खाचणे (27) याने देखील गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी पती, सासु-सासरे व शालकाच्या जाचामुळे आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरी कुणी नसताना केली आत्महत्या
पंकज उखर्डू खाचणे (27) रा.आसोदा रोड, गोपाळपूरा मंदिरापुढे, राजू होले चक्कीपुढे, जळगाव हा तरुण आपल्या आई व पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहे.
वेल्डींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या पंकजची तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत असताना त्याची ओळख भुसावळ येथील चंचल सोबत झाली होती व नंतर दोघांनी चार वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, पंकजची पत्नी दिवाळी निमित्त मुलांसह माहेरी गेल्याने पंकज हा त्याची आई कल्पना खाचने हे दोघे घरी होते. रविवारी सकाळी पंकजची आई कल्पनाबाई बळीराम पेठेत भाजीपाला विक्री करण्यासाठी गेल्या असताना घरी एकटाच असलेल्या पंकजने राहत्या घरात घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आई कल्पना या दुपारी 12 वाजता घरी आल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. यावेळी शनीपेठ पोलिसांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट
दरम्यान, पंकजने सुसाईड नोट लिहिली असून त्यात सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी कारणीभूत ठरविले आहे. आपल्या आत्महत्येला पत्नी चंचल आणि तिचा भाऊ राहुल पांडव जबाबदार आहेत. चंचलचा भाऊ नेहमी घरी येऊन आम्हाला धमक्या देत होता. माझे सासरा पोलीस असल्याने ते पोलिसांच्या धमक्या देत होते. एकदा भुसावळ गेलो असता शालक व सालीने आपणास मारहाण केली. मी मेल्यानंतर माझा मुलगा माझ्या आईजवळ राहील हीच माझ्या आत्म्याला शांती असेल, असा उल्लेखही या चिठ्ठीत असून चंचल तिच्या आईचे ऐकायची म्हणून आमचा संसार मोडला, असा चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला आहे. मयत पंकजचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला असून शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत.


