चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याकडील सात लाखांची रोकड लांबवली –

जामनेर : चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याला चौघांनी लुटल्याची घटना सोनाळा फाट्याजवळ घडली. चोरट्यांनी कापूस व्यापार्‍याकडील तब्बल सात लाखांची रोकड लांबवल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

चोरटे मागावर असल्याचा संशय
सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान पप्पू ती स्टॉल पासून 200 मीटर अंतरावर मोटरसायकलवर दोन जण त्यांचा पाठलाग करत होते तर तलावाजवळ आधीच दोन जण थांबलेले होते. बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांची मोटरसायकल अडवत चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील सात लाख रुपये लूटत पळ काढला.

ही न्यूज महत्वाची, वाचली का-तरसोदजवळ डंपर अपघातात ठार झालेली महिला भुसावळातील कंडारीतील रहिवासी
घटनास्थळी अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांनी भेट दिली.

पहूर पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत कापूस व्यापारी संजय पाटील यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे, हंसराज मोरे हे करीत आहे.