मोबाईल चोरटे जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात :


जळगाव : शहरातील शाहु नगर परीसरातून मध्यरात्री घरातून चार मोबाईल लांबविणार्‍या चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरातून लांबवले मोबाईल
विशाल विनायक काटकर (33, रा.शाहुनगर, ट्रॅफीक गार्डन) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. सोमवार, 22 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता सर्वजण जेवण करून झोपले होते. त्यावेळी पावसाचे पाणी आल्याने घराचा दरवाजा लागत नसल्याने त्यांनी दरवाजा लोटला व झोपी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील सदस्यांचे 59 हजार रूपये किंमतीचे 2 मोबाईल चोरून नेले. त्यांच्याच घराजवळ राहणारे सतीष गजानन साळुंखे (39) यांचे देखील दोन मोबाईल असे एकुण 59 हजाराचे चार मोबाईल चोरीला गेल्याचे मंगळवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता उघडकीला आले. एकूण चार मोबाईल लांबविल्याने परीसरात खळबळ उडाली होती. विशाल विनायक यांनी बुधवार. 23 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून मोबाईल चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सकाळी 9 वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना संशयीत आरोपी हे सुरत येथे जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय निकुंभ, हवालदार खवले, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक भास्कर ठाकरे, योगेश पाटील, कॉन्स्टेबल रतन गीते, कॉन्स्टेबल तेजस मराठे, योगेश इंधाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर यांनी अवघ्यात एका तासात संशयीत आरोपी शोयब उर्फ एक्का शरीफ भिस्ती (20), सागर राजू उगले (25) आणि जुबेर उर्फ डेविड जावीद भिस्ती (22, तिघे रा. शाहू नगर) यांना बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी 11 वाजता शाहू नगरातून अटक केली. तिघांकडून चोरीचे चारही मोबाईल हस्तगत करण्यात आले.