अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवली : सुरतचा आरोपी जाळ्यात : संपूर्ण मुद्देमाल जप्त : भुसावळ रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कामगिरी :

भुसावळ : अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सुरत ते रायपूर प्रवासी करणार्‍या महिलेची सुमारे सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स जळगाव-भुसावळ दरम्यान चोरट्यांनी लांबवल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त कारवाई करीत सुरतमधील आरोपीच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. अब्दुल साबीर रहेमान शेख उर्फ लंगडा (30, बि.नं.09, वी-ब्लॉक, वेस्तान आवास, सचिन रोड, दिंडोली, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

झोपेचा फायदा घेत पर्स लांबवली
21 नोव्हेंबर रोजी तक्रारदार गीताबेन योगेश पटेल (38, रा.सुरत, गुजरात) या डाऊन ट्रेन क्रमांक 02844 अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए- 1 च्या बर्थ क्रमांक 41 वरून सुरत ते रायपुर प्रवास करीत असताना पहाटे 4.20 ते 4.45 दरम्यान त्यांना झोप लागल्याची संधी साधून चोरट्याने पर्स लांबवली. जळगाव ते भुसावळ दरम्यान ही घटना घडली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचा गळ्यातील हार, दोन सोन्याच्या गळ्यातील चैन, एक सोन्याची कानातील रींग, एक सोन्याची अंगठी, एक ग्रे रंगांचा सँमसंग कंपनीचा मोबाईल व एक हजारांची रोकड मिळून पाच लाख 62 हजारांचा मुद्देमाल होता. वडनेरा येथे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटा जाळ्यात
भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू केल्यानंतर भुसावळ स्थानकावर संबंधित ट्रेन आल्यानंतर प्रत्येक प्रवाशांच्या हालचाली टीपल्या असता पायाने अपंग असलेला इसम उत्तर बाजूच्या दिशेने निघाल्यानंतर रीक्षातून गेल्याचे समजल्यानंतर रीक्षा चालकाचा शोध घेण्यात आला व अपंग असलेला इसम कन्हैयाकुंज हॉटेलमध्ये उतरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयीताची माहिती काढल्यानंतर त्याचे नाव साबीर लंगडा असल्याचे व तो सुरत येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाल्याने पथक पाठवून त्यास अटक करण्यात आली. अब्दुल साबीर रहेमान शेख उर्फ लंगडा (30, बि.नं.09, वी-ब्लॉक, वेस्तान आवास, सचिन रोड, दिंडोली, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एकूण पाच लाख 63 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, आरपीएफ कमांडंड क्षितीज गुरव, लोहमार्ग पोलीस उपअधीक्षक दीपक काजवे, भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक विजय घेरडे, भुसावळ आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मीना, आरपीएफ अपराध खुपिया शाखेचे निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय साळुखे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार ठाकुर, हवालदार लुले. हवालदार खंडारे व आरपीएफ आरक्षक भुषण पाटील, आरपीएफ आरक्षक कैलास बोडके यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणणार्‍या पथकास लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पाच हजारांचा प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले.