भुसावळातील कंडारीच्या रहिवासी परीचारीका तरसोदजवळ डंपर अपघातात ठार ;


जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील कंडारीतील रहिवासी असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रेरणा देविदास तायडे (32, रा.कंडारी, ता.भुसावळ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेमणुकीला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डंपर चालक रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचे सत्र कायम आहे. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

.घराकडे परत असताना क्रुर काळाचा घाला
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अधिपरीचारीका असलेल्या प्रेरणा देविदास तायडे (32) यांनी बुधवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेदरम्यान आपली शिप्ट संपवून घराकडे दुचाकीने निघाल्या असतानाच कु्रर काळाने त्यांच्यावर घाला घातला. भरधाव वेगाने जात असलेला डंपर (एम.एच.19 वाय.7773) ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने प्रेरणा तायडे या जागीच ठार झाल्या. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलियार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली तर पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.