तरसोदजवळ भरधाव डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार – महामार्गावर अपघातांची मालिका कायम : अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर ;

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डंपर चालक रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचे सत्र कायम आहे. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुचाकीला उडवल्याने महिला जागीच ठार
भरधाव वेगाने जात असलेला डंपर (एम.एच.19 वाय.7773) ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील भुसावळ तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली तर पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.