भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण केली. दरम्यान, युवतींचा विनयभंग करण्यासह जातीवाचक शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विनयभंग करीत मारहाणीचा आरोप
साकेगाव येथे दोन मैत्रीणी रूम करून राहतात. सोमवार, 22 रोजी त्यांनी त्यांच्या साकेगावातील ओळखीच्या भरत चंद्रकांत मराठे या तरूणाला एटीएममध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. त्याने मदत तर केली नाहीच, पण दिवसभर फोन करून अश्लील भाषेत धमकावल्याचा आरोप आहे शिवाय सोमवारी रात्री साडेनऊ वाजता भरत चंद्रकांत मराठे याच्यासह त्याचे वडील चंद्रकांत मराठे, आई छायाबाई चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री आणि शुभम (पूर्ण नाव माहित नाही) यांनी या दोन्ही युवतींना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावले. तेथे त्यांना अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. हा प्रकार रात्री बारा वाजेपर्यंत चालला. यामुळे गावात खळबळ उडाली. या संदर्भात संबंधीत तरूणीने भुसावळ तालुका पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर भरत चंद्रकांत मराठे, छायाबाई चंद्रकांत मराठे, चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री, शुभम (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरूध्द अॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देत घडला प्रकार जाणून घेतला. गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात शांतता असल्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी सांगितले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


