प्रवाश्यांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन :

भुसावळ – रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन वापराकरता अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशीरा पोहोचणे, मधल्याच स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी शुल्लक कारणांसाठी प्रवासी अलार्म चेन पुलिंग (ACP) करीत असल्याचे दिसून येत आहे.म्हणून प्रवाश्यांनी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले आहे .

ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंग (ACP) च्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही तर मागाहून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP) चा गैरवापर केल्याने इतर अनेक प्रवाशांची गैरसोय होते.

मध्य रेल्वे मुंबई विभाग अशा अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. चालू कॅलेंडर वर्षात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १,६०८ अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे १,३८१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १०.०६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे, प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी अनावश्यक / शुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP) चा सहारा घेऊ नये ज्यामुळे उर्वरित प्रवाशांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.