भुसावळ – प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्षनिलेश कोलते यांनी केली असून याबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती असलेले निवेदन देण्यात आले

मागील अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणाऱ्या रस्ताचे नूतनीकरण झालेले नाही आणि त्यातच आता या नादुरुस्त असलेल्या ढाप्यावरून गटारीचे पाणी वाहत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. पावसाचे पाणी काही ठिकाणी साचत आल्याने हे ढापे जीवघेणे ठरत आहेत कारण त्यात वाहने अडकून पडल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत.
युवा संकल्प चौक ते पाटील मळा व राम देवबाबा नगरला जोडणारे सर्व ढाप्याचे चाळण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना ढाप्यावरून वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सतत वर्दळ होत आहे.
नागरिक त्रस्त:
दुचाकीचालक, रिक्षा चालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. वाहने ढाप्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळते तर पाठदुखीचा त्रास वाहनचालकांना होत आहे. खडे टाळण्याचा प्रयत्नात या भागात किरकोळ अपघातही घडले आहेत. रात्रीच्या वेळेला ढाप्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे वाट काढणे जिकरीचे होते. भुसावळ नगर पालिका प्रशासनाने त्वरीत सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौक, रामदेव बाबा मंदिराजवळील तसेच राजगौड सोसायटी जवळील या सर्व चारही ढाप्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी केली आहे.
काम लवकरच सुरू होणार: मुख्याधिकारी
मंगळवारी सकाळी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात आली. लवकरच सर्व ढापे दुरुस्त करण्यात येतील तसेच काही ठिकाणी नूतनीकरण करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी यांनी उपस्थितांना दिली.


