नाशिक विभागीय सहनिबंधकांनी अपिल फेटाळले : माजी आमदार संतोष चौधरींची औरंगाबाद खंडपीठात धाव ;


भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीत भुसावळातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर चौधरी यांचे अपिल फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. फेटाळलेल्या अर्जासंदर्भात अपिल दाखल करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात आल्याची माहिती माजी आमदार चौधरी यांनी फोन दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीत रंगत आली असतानाच भाजपा खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. माजी आमदार चौधरी यांनी अर्ज बाद झाल्यानंतर सहकारी संस्थेचे नाशिक विभागीय निबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले मात्र तेथेही अपिल फेटाळल्यानंतर चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. अपिल दाखल करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, उच्च न्यायालयात आता काय निकाल लागतो ? याकडे आता राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे.