जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने भाजपाला धक्का देत तीन उमेदवारांची निवड करण्यात यश मिळवले. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी असलीतरी तिघांची निवड बिनविरोध मानली जात आहे. धरणगाव विविध कार्यकारी सोसायटीतून संजय मुरलीधर पवार तर पारोळा विकासोतून चिमणराव पाटील तर एरंडोल विकासोतून अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने सर्व जागांवर तयारी करण्याच्या भाजपच्या दाव्याला धक्का देण्याचे काम केले आहे.

अखेरच्या दिवशी धक्कातंत्राचा वापर
सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली असून याबाबत नंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. याचप्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आजच भाजपने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केल्यानंतर एका तासातच महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संजय पवार, अमोल पाटील, विजय भास्कर पाटील, ज्ञानेश्वर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


