पालिकांच्या कोरोना शहिद योद्ध्यांना मिळणार अनुदान – आमदार संजय सावकारे, डॉ.नि.तु.पाटील यांचा पाठपुरावा

भुसावळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शहिद करोना योद्ध्यासाठी 50 लाख सानुग्रह सहाय्याची योजना देण्याबाबत नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी 28 जुलैला निर्णय घेतला होता. यानंतर आता 12 ऑक्टोंबरला त्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यासाठी लेखी आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढले आहे. यामुळे ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महानगरपालिका वगळता सर्व इतर महापालिका व नगरपालिकांना शहिद कोरोना योद्ध्यांसाठी लवकरच सानुग्रह मदत मिळण्यास मदत होईल. यासाठी आमदार संजय सावकारे व भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ.नी.तु.पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
कोरोनाच्या महामारीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी केंद्र सरकार सानुग्रह मदत तर राज्य कर्मचारी वर्गासाठी राज्य सरकार सानुग्रह मदत मिळणार आहे. याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कोरोना शहिदांनाही मदत मिळावी, अशी मागणी आमदार संजय सावकारे व डॉ. नी. तू. पाटील यांनी केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावाही केला होता. भुसावळ नगरपरीषदेकडे 24 फेब्रुवारीला लेखी पत्र देत मागणी केली होती. पण भुसावळ नगरपरीषदेने यावर काहीही कारवाई केली नाही. फक्त प्रोत्साहन भत्ता देत आहे, असे 4 मार्च रोजी कळविले होते. यानंतर नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करण्यात आला. स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थानी देखील त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी एखादी सानुग्रह सहाय्याची योजना लागू करावी, असे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णय अनु.3 (ब)(5) नुसार 29 मे रोजी कळविले होते. या निर्णयामुळे तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.