भुसावळ- येथील ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी 21 लाखांचा निधी मंजूर -आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याला यश : भुसावळात शवविच्छेदन कक्ष निर्मितीमुळे मनस्ताप होणार दूर
भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरच्या उर्वरीत कामासाठी जिल्हा नियोजन समितीने चार कोटी 21 लाख 198 रुपयांचा निधी मंजूर केला. ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये यामुळे नवीन सेवा सुविधा मिळणे शक्य झाले आहे. निधीतून शवविच्छेदन कक्षाचीही निर्मिती होणार असल्याने मृतदेहाची होणारी अवहेलनाही थांबणार असून त्यासोबत नातेवाईकांचा मनस्ताप कमी होण्यास मदत होणार आहे.

निधीतून या कामाला मिळणार चालना
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये विविध कामांसाठी आमदारांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दिला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. तब्बल 4 कोटी 21 लाख 198 रुपयांच्या या निधीतून ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये उर्वरित बांधकाम केले जाईल. यात नवीन पीएम रुम अर्थात शवविच्छेदन रुम बांधकाम करणे, 900 मीटर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, दोन्ही इमारतींना जोडणार्या कॅरीडॉरचे बांधकाम करणे, अंतर्गत रस्ते व डांबरीकरणाचे काम पूर्ण करणे, पार्किंग शेड बांधकाम, पंपहाऊस व बोअरवेल बांधकाम, मेडीकल वेस्ट डिस्पोजल टँक बांधकाम, पेव्हर ब्लॉक व फ्लॅग पोस्ट बनविणे आदी कामे पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.
शवविच्छेदनासाठीचा त्रास होणार कमी
रुग्णसेवेशी थेट संबधीत कामे असल्याने या कामांना मंजुरीनंतर तत्काळ गती दिली जाणार असून शवविच्छेदन कक्षामुळे स्थानिक स्तरावर शवविच्छेदन होणार असल्याने नातेवाईकांचा मनस्ताप कमी होणार आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या इमारत परीसरात रस्त्यांचे डांबरीकरण करणासह अन्य सर्वच कामे अत्यंत महत्वाची असल्याने निधी मंजुरीनंतर आता कामांना वेग येणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले.


