सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश – मोदींची घोषणा –


नवी दिल्ली –
७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये करोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडले. यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे.

लष्करामध्ये आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.

सैन्यात भरती होण्याची आणि देशासाठी लढण्याची आमचीही इच्छा आहे. आम्हालाही सैन्यात भरती करून घ्या, अशी मागणी तृतीय पंथीयांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मुलींनाही सैनिकी शाळेत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.यावर आता तृतीयपंथी समाजतील लोकांनीसुद्धा आता सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लाखो मुलींनी मला संदेश पाठवले
देशात सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असताना दिसत आहेत, मात्र सेनेमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की, त्या देखील सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जावेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग सुरू केला होता.

आता सरकारने ठरवले आहे की, देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडले जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील, असे मोदींनी यावेळी जाहीर केले.