भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 315 विषयांना मंजुरी : विरोधकांनी सभेवर टाकला बहिष्कार ;
भुसावळ –
पालिकेच्या रखडलेल्या सभेला आठ महिन्यांनी मुहूर्त मिळाल्यानंतर शुक्रवार, 16 रोजी झालेल्या ऑनलाईन सभेत 315 विषयांनी सत्ताधार्यांनी एकमुखाने मंजुरी दिली. अजेंड्यावर 317 विषय असलेतरी दोन विषय दोनवेळा लिहिल्याची बाब नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्यानंतर हे विषय कमी केले जातील, असे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, विरोधकांच्या प्रभागात कामे होत नसल्याने विरोधकांनी या सभेवर बहिष्कार टाकला. सत्ताधारी 39 नगरसेवक ऑनलाईन सहभागी सहभागी झाले.
तब्बल आठ महिन्यांनी झालेल्या या ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे होते. या सभेत अजेंड्यावर एकूण 317 विषय घेण्यात आले होते. या सभेतील सर्व विषयांना नगरसेवकांनी आवाजी बहुमत देवून मंजूरी दिली. दरम्यान, या सभेत आयत्या वेळीच्या विषयात नगरसेवक निर्मल कोठारी यांनी यावल रोडवरील स्मशानभूमीचा आगामी काळात सर्व प्रकारचे मेंटनन्स, डागडूजी, वृक्षारोपण आदी सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्तीचे काम साईजीवन सुपर शॉपीला द्यावे, अशी अशी विनंती केली. यावर प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सहमती दर्शवली.
दरम्यान पालिकेच्या या सर्वसाधारण सभेवर मात्र विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीचे गटनेता दुर्गेश ठाकूर म्हणाले की, सत्ताधार्यांच्या वॉर्डातच कामे होत असून विरोधकांच्या प्रभागात कामे केली जात नाही. राजकारणामुळे विरोधकांच्या वॉर्डाचा विकास थांबल्याने आजच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.



