मुक्ताईनगर –
सासुरवाडीला आलेल्या मेव्हण्याने शालकाच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील भुसावळ मुक्ताईनगर रोडवर कोर्टाजवळ विशाल वामन ठोसरे हा युवक राहतो. त्याच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता. यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. मात्र यानंतर त्यांचे कौटुंबिक वाद झाले होते. मात्र अलीकडे त्यांचेत सलोखा झाल्याने त्याची बहिण सासरी नांदत होती.

दरम्यान काल रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला. येथे त्याने गोंधळ घातला. मात्र हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे हे आपल्या कुटुंबियांसोबत झोपले होते. दरम्यान, आज पहाटे विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली .तेव्हा त्यांना आपला मुलगा रक्ताच्या थारोलळयात असल्याचे दिसले आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घातलेले दिसले. त्यांनी आक्रोश करीत घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला.
या गोंधळात विजय सावकारे हा घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा दाट संशय यावेळी व्यक्त करण्यात आला .
खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


