भुसावळ ( प्रतिनिधी )-
भुसावळ नगरपरिषदेची येत्या १६ जुलै २०२१ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या विषय पत्रिकेत प्रभागातील समस्या न घेतल्याने येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांनी मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे.

निवेदनाचा म्हटले आहे की, भुसावळ नगरपालिकेची शुक्रवार १६ जुलै रोजी विविध कामांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये एकूण ३१७ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या ३१७ विषयांमध्ये दुर्गेश ठाकूर यांच्या प्रभाग क्र. २४ मधील एकाही समस्येचा समावेश नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते आदिवासी समाजातून येत असल्याने हेतू पुरस्पर त्यांच्या वार्डातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ठाकुर यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या वार्डातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक ठाकूर हे नेहमीच आपल्या वॉर्डातील समस्यांचा पाढा नगर परिषदेमध्ये मांडत असतात, मात्र त्यांच्या मागण्या व निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांच्या समस्यांना न्याय व हक्क मिळण्यासाठी उपोषणा शिवाय आपणाकडे दूसरा पर्याय नसल्याने १४ जुलै रोजी भुसावळ नगरपरिषद येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दुर्गेश ठाकुर यांनी दिला आहे.


