कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक सुविधा पुरवा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश –


जळगाव –
जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ‘कोविड-19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची (Task Force) बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त् सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते तर पोलीस निरिक्षक बापू रोहोम, जिल्हा बालकल्याण समितीच्या वैजयंती तळेले व इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले हेाते.
जिल्हाधिकारी श्री.राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांचा विषय संवेदनशील आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड 19’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत. ‘कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा.
जी बालके नातेवाईकांकडे राहत असतील त्यांचा नियमानुसार सांभाळ करण्याबाबत सुचना देणे, दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणे, पालकांचे शिक्षण व इतर बाबींसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.

जिल्ह्यात सध्या दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 9 असून यापैकी 7 बालके हे 18 वर्षाच्या आतील तर 2 बालके 18 वर्षावरील आहेत. तर एक पालक मृत्यु पावलेल्या बालकांची संख्या 191 इतकी असून त्यापैकी 134 बालके हे 18 वर्षाच्या आतील, 52 बालके 18 वर्षावरील तर 5 बालके हे एक वर्षाखालील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *