भुसावळातील प्रभाग 20 मध्ये रस्त्यांसह अन्य प्रश्‍न 15 दिवसात सुटणार – माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही : आर.ओ.जलसेवेचे उद्घाटन


भुसावळ –
शहरात पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासात्मक कामे करण्यात आली आहेत, आगामी काळातही व्यापक कामांचे नियोजन आहे. शहरातील प्रभाग 20 मध्ये रस्त्यांसह नाले, पेव्हर ब्लॉक बसवण्यासह अन्य रखडलेली कामे 15 दिवसात मार्गी लागतील, अशी ग्वाही माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. शहरातील प्रभाग 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी प्रभागातील 500 नागरीकांसाठी मोफत आरओ वॉटर व जलसेवा केली. या कामाचे उद्घाटन करताना खडसे बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, स्विकृत नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले की, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी मतदारांना जे आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता केली आहे. गोर-गरीबांनाही आरओचे पाणी मोफत उपलब्ध करून देणारे ते एकमेव नगरसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रभाग 20 मध्ये काही कामे अपूर्ण असून पेव्हर ब्लॉकच्या कामांना आगामी काळात गती दिली जाणार आहे. या व्यतिरिक्तही काही कामे असतील तर ती पूर्ण केली जातील. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनीही नगरसेवक ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची स्तुती करून या भागातील तांत्रिक प्रश्नामुळे रखडलेल्या पेव्हर ब्लॉकचे कामे पूर्ण केले जातील, असेही सांगितले. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.
टोल नाक्यांसह ब्रेकरचा अडथळा : पिंटू ठाकूर
नगरसेवक पिंटू ठाकूर म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी माझ्याकडे गती अधिक आहे मात्र मध्येच टोलनाके, स्पीड ब्रेकरचा अडथळा येतो मात्र असे असलेतरी आपण विकासाची गती करणार्‍यांना अजीबात जुमानत नाही.
प्रभागातील नागरीकांना जे आश्वासने दिली त्याची पूर्तता करण्याचे प्रयत्न करीत आहे. गेल्या काळात आरओ वॉटरचे दिलेले आश्वासनही पूर्ण करीत आहे. वॉर्डात आगामी काळात पेव्हर ब्लॉकसह अन्य रखडलेले कामेही मार्गी लागतील, एकही काम शिल्लक ठेवणार नाही, असेही नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *