भुसावळ (प्रतिनिधी )-
अनेक दिवसांपासून भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने भुसावळ कंडारी रस्ता बंद केला होता या संदर्भात शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनास निवेदने दिली परंतु फॅक्टरी प्रशासनाने रस्ता बंदच ठेवला. भुसावळ उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे व शिवसेना पदाधिकारी यांनी दोन दिवसात रस्ता खुला न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शिवसेनेचा इशारा मिळताच आज दिनांक २४ मे रोजी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला असून शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समितीच्या मागणीला यश मिळाले आहे.
५००० नागरिकांना दिलासा:
दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने ५००० नागरिकांचा पेट्रोलवर जास्त खर्च होत होता तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना दवाखान्यात दाखल करतांना अडचणींचा सामना करावा लागत होता म्हणून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेही शिवसेनेतर्फे तक्रार करण्यात आली होती. रस्ता खुला झाल्याने रेल्वे, ऑर्डनन्स फॅक्टरी, दिपनगर कर्मचारी, हात मजूर, व परिसरातील सर्व नागरीकांना दिलासा मिळाला आहे असे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी म्हटले. सर्व शिवसेना पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि कृती समिती सदस्य यांनी जनरल मॅनेजर वसंत निमजे यांचे आभार मानले.



