भुसावळ (प्रतिनिधी )-
लसीकरणानंतर येणाऱ्या मेसेजबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी निर्माण झाल्या आहेत. अनेक नागरिकांना पहिली लस घेतल्याचे मेसेज मिळालेले नाहीत; त्यामुळे त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे या नागरिकांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी आल्या. दुसरा डोस घेतल्यावर काही नागरिकांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला. या तांत्रिक समस्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. सध्याच्या टप्प्यात लाभार्थी व्यक्तींमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने मे महिन्याच्या उन्हात पहिला डोस घेतलेल्या केंद्रावर फेऱ्या मारणे त्यांना अडचणीचे होत आहे. या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याची मागणी केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलच्या टेक्निकल टीमकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच केंद्र सरकारला महाराष्ट्रासाठी वेगळ्या पोर्टलची मागणी केली आहे.
कोव्हिशिल्ड घेतल्यावर कोव्हॅक्सिनचे मेसेज
काही जणांना कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर कोव्हॅक्सिन घेतल्याचे मेसेज मिळाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना, लसीकरणाचाही वेग वाढविण्याशिवाय पर्याय नाही म्हणून तांत्रिक अडचणी लवकर दूर केल्या पाहिजे.
पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट अनिवार्य
पहिला डोस घेतल्यानंतर मेसेज न मिळालेल्या नागरिकांना पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे पहिल्या केंद्रावर जाऊन त्यांनी ते आणावे, त्यामुळे दुसरा डोस मिळणे सहज शक्य होईल. पहिला व दुसरा डोस यातील अंतर ४५ दिवस किंवा जास्त असावे. डोस २ साठी त्यांचे केंद्रावर नवीन रजिस्ट्रेशन होईल आणि दुसरा डोस दिला जाईल. दुसरा डोस घेतल्याचा मेसेजसुद्धा त्या नागरिकांच्या मोबाईलवर येईल आणि सर्टिफिकेट मिळेल असे तांत्रिक समिती द्वारे कळविण्यात आले आहे.



