पिस्तुलाच्या धाकावर खंडणी मागितल्या प्रकरणी हंसराज खरातसह चिन्नाची जामिनावर सुटका ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होवून आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांनी भुसावळ सत्र न्यायालयात न्या.पी.व्हि.चिद्रे यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो सोमवारी 50 हजारांच्या जात मुचलक्यावर मंजूर करण्यात आला. गुन्ह्याचे दोषारोपत्र न्यायालयात सादर करेपर्यंत आरोपींना दर सोमवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.भागवत पाटील यांनी युक्तीवाद केला.
बुधवार, 6 जानेवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आरोपींनी रेल्वे पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दर महिना पाच हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली होती मात्र रक्कम न दिल्याने आरोपींनी एक हजार 200 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *