गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी)-; शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात डीवायएसपी केदार बारबोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, कॉन्स्टेबल तेजस, उद्योगपती मनोज बियाणी, आदिवासी ठाकूर समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकूर तसेच भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य मुळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या उद्देशाने मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळाल्याने पालक व उपस्थितांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

भविष्यातही विद्यार्थ्यांसह समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.