शिंदी परिसरात शेतातील विद्युत तार चोरीच्या घटनांत वाढ ;

तार चोरीमुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी धावपळ; प्रलंबित वीज जोडणीमुळे शेतकरी हैराण, चोरट्यांवर कडक कारवाईची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)-: शिंदी परिसरातील शेतांमधून विद्युत तार, मोटारीचे वायर तसेच इतर विद्युत साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण होत आहे. चोरी झालेल्या ठिकाणी नवीन विद्युत तार ओढण्याचे काम प्रलंबित असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शिंदी परिसरासह मोंढाळे, खंडाळे व विचवे परिसरातील विविध शेतांमधून विद्युत तार चोरीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी महावितरणकडून संबंधित भुसावळ ग्रामीण व बोदवड पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, गुन्हे दाखल होऊनही तार चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शिंदी परिसरातील चोरीच्या घटना

शिंदी येथील श्री. बळीराम कीटकुल पाटील यांच्या गट क्रमांक ११० मधून २६ मे २०२६ रोजी विद्युत तार चोरीला गेली. सौ. कुंदा सुधीर चौधरी यांच्या गट क्रमांक २०६/२/२ मधून २० एप्रिल २०२६ रोजी, तर सौ. चंद्रभागाबाई रमेश पाटील यांच्या गट क्रमांक २३४/अ मधून ३० मे २०२६ रोजी तार चोरीची घटना घडली.

तसेच श्री. प्रभाकर माधव कोल्हे यांच्या गट क्रमांक १५९ मधून १३ जून २०२६ रोजी आणि श्री. विलास मुरलीधर पाटील यांच्या गट क्रमांक २२६/१/१/अ मधून १० ऑगस्ट २०२६ रोजी विद्युत तार चोरीला गेल्याची नोंद आहे.

मोंढाळे, खंडाळे व विचवेतही चोरी

मोंढाळे येथील श्री. सुरेश नरसिंग कोळी यांच्या गट क्रमांक १९६/१/१ मधून ११ डिसेंबर २०२५ रोजी, तर श्री. अर्जुन चिंधू लोहार यांच्या गट क्रमांक ६८/२ मधून २२ डिसेंबर २०२५ रोजी विद्युत तार चोरीला गेली.

खंडाळे येथील श्री. अनिल देवराम सुरवाडे यांच्या गट क्रमांक १० मधून १६ जून २०२५ रोजी चोरीची घटना घडली. विचवे येथील श्री. भरत पंढरी भोळे यांच्या गट क्रमांक ०४ मधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी, तर श्री. अरुण प्रल्हाद येवले यांच्या गट क्रमांक ५/२/१ मधून २० एप्रिल २०२६ रोजी विद्युत तार चोरीला गेल्याची माहिती आहे.

दिवसा वीजपुरवठा, रात्री चोरीचा धोका

शेतातील वीजपुरवठा प्रामुख्याने दिवसा उपलब्ध होत असल्याने रात्रीच्या वेळी शेत परिसरात चोरट्यांना विद्युत तार कापून नेण्याची संधी मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तार चोरीनंतर वीजपुरवठा खंडित होऊन पिकांना पाणी देणे अवघड होते. नवीन तार ओढण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान तसेच पिकांच्या उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

महावितरणकडून तार चोरीच्या घटनांबाबत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी चोरीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन व महावितरणने समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

विद्युत तार चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन चोरट्यांवर कडक कारवाई कधी होणार, तसेच चोरी झालेल्या ठिकाणी प्रलंबित असलेली तार ओढण्याची कामे कधी पूर्ण होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वारंवार होणाऱ्या तार चोरीची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.