दीपस्तंभांची ओळख करून देणारे ‘उजेड पेरणारी माणसं-सौ अर्चना बेंगळे /जगताप ;

भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आनंदा लाेटन पाटील यांचं ‘उजेड पेरणारी माणसं’  हे पुस्तक वाचून झालं. पेन पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केलं आहे. अवघ्या ३० दिवसांत या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी प्रकाशित झाली आहे. 

आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक पुस्तके वाचली कुणाची आत्मचरित्र, कुणाचा संघर्ष, तर कोणाचा संघर्षातून विजयी... ज्याने त्याने आपल्या बद्दल ग्रामीण विषयाला अनुसरून कोणी ,निसर्गावर केलेले कथन, वाचले पण असं लिखाण हे एकमेव. आनंदा पाटील यांनी दुसऱ्याचं आयुष्य आपलं मानून ज्यांनी ज्यांनी पडद्यामागे राहून जी भूमिका केली आहे समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे अशा अवघ्या जगात ‘उजेड पेरणारी माणसं’ शोधून त्यांना दीपप्रज्वलित केल्याचे खूप मोठे योगदान महान कार्य केलं आहे. 

स्वतः पत्रकार असून समाजातील कानाकोपऱ्यातील दिव्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या अशा काही मंडळींना लेखकाने पडद्यामागे न ठेवता पडद्याच्या पुढे आणून आम्हा वाचकांना जागे केले आहे. ‘अंतरीची ओल’ या शिर्षकाखाली लिहिलेलं मनाेगत हृदयाचं तळघर दणाणून साेडणारं आहे. बापाला दिलेली कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी लेकराने केलेली धडपड त्यात अधाेरेखीत केली आहे. त्यातला प्रत्येक शब्द वाचताना वाचकाला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. 

आजच्या काळात व्यक्तीचित्रणाची मोठी गरज आहे. केवळ अनेक साहित्य ग्रंथ महान नेत्यांची चरित्र वाचण्याच्या बरोबरीने अशाही काही आपल्याच अवतीभवती शांततेने जे समाजकार्य करणाऱ्या या दीपस्तंभाची ओळख आत्ताच्या आणि येणाऱ्या पिढीला करून देणे खरंच खूप गरजेचे आणि आवश्यक आहे. ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकात सत्तरी ओलांडलेल्या अनुभवी वटवृक्षासमान ज्येष्ठांसह पंचवीशीतील उमदा कलाकार तरुणापर्यंत पडद्याआडच्या माणसांची गाेष्ट वाचायला मिळते. 

खरोखरच ही माणसे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करून आपल्या आयुष्यात नक्कीच उजेड पेरून जाणारी आहेत. त्यांचे हे महान कार्य समाजापुढे आणणे अत्यंत सामाजिक बांधिलकीचे मौलाचे योगदान ठरणार आहे. वंचित मुलांसाठी धडपडणारी वैशाली झाल्टे, अवनी उपक्रम राबवणारी राजेश्री सुरवाडे, वर्षानुवर्षे एका अपघातामुळे अंथरुणाला खिळलेल्या पतीची सेवा करीत असताना लिहिणाऱ्या सीमा भारंबे, पिशवीवालीबाई अशी ख्याती मिळवलेल्या शैला सावंत या भगिनींचे कार्य वाचताना नवी प्रेरणा मिळते. 

समाजापुढे आदर्श युक्त अशी माणसे खरच पुढे येणे अत्यावश्यक आहे. यातून शिकण्यासारखं घेण्यासारखं म्हणजे आदर्शवादी आहे. अशा दीपस्तंभाची दीप प्रज्वलित झालेली मशाल हाती घेऊन आम्हा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य आनंदा पाटील यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

प्रत्येक कलाकार, शिल्पकार, साहित्य  लेखक, कवी यांचे वाचन करीत असताना मी त्यांच्यासमोर अंडरलाइन केले आहे. ठळक अक्षरातील अक्षरे हे मला पुन्हा पुन्हा वाचता यावी म्हणून मी तिथे अंडरलाइन केली. माझ्या स्मरणार्थ ते कायम राहावे म्हणून घेतलेली ही काळजी आहे. अशा महान कार्य करणाऱ्या उजेड पेरणाऱ्या माणसांची मशाल आणि त्यांची साहित्य मला खरेदी करता यावी आणि मला ती आवर्जून वाचायला मिळावी म्हणून मी ठळक अक्षरात त्यांची नोंद करून ठेवली आहे.

‘उजेड पेरणारी माणसं’ हा केवळ एक लेखसंग्रह नाही तर ताे लेखक आनंदा पाटील यांचा जगण्याचा आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकाेनाला समृद्ध करणारा कृतज्ञतेचा एक अनमाेल दस्तऐवज आहे. सर्वांनी जरूर वाचावी अशी काही पुस्तके असतात की जी समाजात नक्कीच आपल्याही आयुष्यात उजेड पेरून जाणारी ठरतात. त्यात ‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचा नामाेल्लेख अग्रमाने करावा लागेल. 

 सौ. अपर्णा बेंगळे / जगताप
ब्लॉग राइटर, पुणे (महाराष्ट्र)