अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला दहा वर्ष शिक्षा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अल्पवयीन 15 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अकिल शाह जब्बार शाह (फकिरवाडा, रावेर) यास 10 वर्ष सक्तमजुरी व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने न्या.एस.बी.भन्साली यांनी सुनावली.
2015 मध्ये ही घटना घडल्यानंतर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
15 वर्षीय पीडीतेची आई मरण पावली असून तिचे वडिल उल्हासनगरात राहतात तर पीडीता नातेवाईकांकडे राहत असताना मिस्तरी म्हणून कामाला आलेल्या आरोपी अकिल शाह याने तरुणीला धमकी देत घराजवळून दुचाकीवरून पळवून नेले होते. सुरुवातीला बर्‍हाणपूर व तेथून खंडवा येथे नेत अत्याचार करण्यात आला तर सुरुवातीला या प्रकरणी हरवल्याची व नंतर पीडीतेच्या आजीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुरनं.क्रमांक 110/2015, भादंवि कलम 376, 363, 366, 505 व पोस्को व अ‍ॅट्रासिटी अन्वये 13 सप्टेंबर 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडीता, पंच, वैद्यकीय अधिकारी, पीडीतेची बहिण, आजी, तपासाधिकारी, रावेर दक्षता महिला समितीच्या सदस्य सुवर्णा भागवत यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली
भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.एस.बी.भन्साली यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. त्यात कलम 363 अन्वये एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने शिक्षा, पोस्को कलम 4 अन्वये 10 वर्ष शिक्षा व 35 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 506 अन्वये सहा महिने शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसांची पुन्हा शिक्षा सुनावण्यात आली तर आरोपीला कलम 366 व अ‍ॅट्रासिटीतून दोषमुक्त करण्यात आले. दंडातील 35 हजारांची रक्कम पीडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.विजय खडसे तर आरोपीतर्फे अ‍ॅड.एम.एस.सपकाळे यांनी काम पाहिले. दरम्यान, या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार समीना तडवी यांनी मदत केली तर तपासाधिकारी म्हणून तत्कालीन पोलिस उपअधीक्षक योगेश चव्हाण यांनी काम पाहिले. गुन्ह्यातील साक्षीदार यांना साक्ष देण्याबाबत वारंवार उजळणी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केली. आरोपीला जळगाव सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *